गेवराई : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ (सोलापूर-धुळे महामार्ग) वरील पाडळसिंगी टोलनाका येथे सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगाकोल्हापूर पॅटर्नप्रमाणे बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळावा, दुष्काळी मदत जाहीर करावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी सकाळी ११ वाजता पाडळसिंगी टोलनाक्यावर एकत्र आले. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने बीड आणि गेवराई या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १० किलोमीटर, अशा एकूण २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांची मोठी कोंडी झाली होती. प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन स्थगितया आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, बीड जिल्हाध्यक्ष राजू गायके, रविराज साबळे पाटील, विवेकानंद पाटील, श्रीनिवास भोसले, नारायण करपे, जयदेव शिंगणे, बाळासाहेब डहाळे, डॉ. गणेश ढवळे, राजेंद्र आमटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाची तीव्रता आणि महामार्गावरील कोंडी लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनानंतर साखर संकुलाचे प्रादेशिक सहसंचालक विशाल सुपेकर आणि गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व या प्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.