वडवणी : शहराच्या प्रवेशद्वारावर आणि मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) एटीएम अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून तब्बल दहा लाख रुपयांहून अधिक रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एटीएम मशीन कापून आतील संपूर्ण कॅश कॅसेटच पळवून नेली आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
चोरीचा नेमका प्रकार काय?
अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसबीआय एटीएम केंद्राला लक्ष्य केले. कटरचा वापर करून एटीएम मशीनचा पत्रा कापला आणि रोकड असलेली संपूर्ण कॅश कॅसेट काढून पोबारा केला. या चोरीत अंदाजे दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, बँकेच्या अधिकृत तपासणीनंतरच चोरीला गेलेल्या रकमेचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.
पोलीस तपास आणि नागरिकांचा संताप
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना (फिंगरप्रिंट पथक) पाचारण करण्यात आले होते; मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे-शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
वडवणी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील चोऱ्यांचा तपास प्रलंबित असतानाच चोरट्यांनी थेट मुख्य चौकातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!