अंबाजोगाई: लातूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने रेणापूर तालुक्यातील एका गंभीर पोक्सो प्रकरणात आरोपी विशाल संदीपान बोडके याची शनिवारी (२१ नोव्हेंबर २०२६) जामिनावर सुटका केली. आरोपीच्या वतीने ॲड. नितीन जाधव यांनी न्यायालयात अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. विशेष न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी सुनावणीअंती आरोपीला सशर्त जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.
रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील विशाल संदीपान बोडके याच्याविरुद्ध २१ जुलै २०२६ रोजी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. पीडित मुलीची आई घरी परतली असता मुलगी घरात दिसून आली नाही. आई-वडिलांनी सर्वत्र चौकशी व शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून रेणापूर पोलिसांनी आरोपी विशाल बोडके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२), ८७, ६९, ६४(आय)(एम) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा (र. क्र. ३९९/२०२६) नोंदवला होता.
या प्रकरणाची सुनावणी लातूरच्या विशेष पोक्सो न्यायालयात पार पडली. यावेळी आरोपीच्या वतीने ॲड. नितीन जाधव यांनी कायदेशीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत भक्कम युक्तिवाद केला. त्यांच्या या प्रभावी मांडणीची दखल घेत न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी २१ नोव्हेंबर रोजी आरोपीची जामिनावर सुटका केली. या न्यायालयीन कामकाजात ॲड. नितीन जाधव यांना ॲड. एम. पी. गायकवाड, ॲड. आर. एस. चौरे, ॲड. जी. व्ही. बुरकुले आणि ॲड. बी. जी. गायके यांनी मोलाचे सहकार्य केले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!