अंबाजोगाई: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नाला निर्णायक वळण देण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदित्य दगडू पतकराव यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत डॉ. पतकराव 'योगेश्वरी ते तुळजाभवानी' या रेल्वे जोडणीचा ठोस प्रस्ताव मांडणार आहेत. या मागणीला बळ देण्यासाठी ग्रामपंचायती, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी आपले अधिकृत ठराव व समर्थन पत्र पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तीर्थक्षेत्रांच्या जोडणीसह पर्यायी मार्गांचा प्रस्ताव
डॉ. आदित्य पतकराव यांनी यापूर्वीही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे अंबाजोगाई रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आताच्या बैठकीत ते २०१६ मधील घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षणाला गती देण्यासह परळी-अंबाजोगाई-मुरुड आणि परळी-अंबाजोगाई-कळंब-येरमाळा-बार्शी या पर्यायी मार्गांचा प्रस्ताव मांडणार आहेत. याशिवाय हा मार्ग धाराशिवला जोडल्यास परळी वैजनाथ, अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी, येरमाळ्याची श्री येडेश्वरी देवी आणि तुळजापूरची श्री तुळजाभवानी या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या भाविकांची प्रवासाची मोठी सोय होणार आहे.
खासदारांच्या पाठपुराव्याची अपेक्षा आणि नागरिकांचे आवाहन
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग पाथरा येथील येडेश्वरी साखर कारखान्याजवळून जाऊ शकतो, ज्यामुळे परिसरातील कृषी आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल. त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या महत्त्वाच्या प्रश्नात तातडीने लक्ष घालून रेल्वे मंत्रालयाकडे जोरदार पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा अंबाजोगाईकर व्यक्त करत आहेत. दरम्यान, या रेल्वे प्रस्तावाच्या समर्थनार्थ नागरिक व संस्थांनी आपले ठराव central.zrucc.govt@gmail.com या ई-मेलवर पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!