परळी वैजनाथ येथील गणेशपार रोडवरील गोपाळ टॉकीजसमोर राहणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास प्रवेश करून ५५ हजार १०० रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही घटना सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेपाच ते साडेपाचच्या दरम्यान घडली.

फिर्यादी हनुमंत तातेराव वाघमारे (वय ६५) हे त्यांच्या पत्नी आशा यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्या वेळी त्यांचा मुलगा प्रतिक हॉलमध्ये, तर मुलगी निकिता बेडरूममध्ये झोपलेली होती. पहाटे साडेपाच वाजता वाघमारे दांपत्य घरी परतले असता त्यांना घराचा गेट उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी बेडरूमची पाहणी केली असता, हँगरला अडकवलेली पत्नीची काळ्या रंगाची पर्स गायब असल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या एकूण दहा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या.

या प्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३२९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाळू निवृत्ती चव्हाण करत आहेत.