अंबाजोगाई: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी जप्त केलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते बँक कॉलनी व राजीव नगर येथील फिर्यादींना त्यांची हक्काची मालमत्ता सन्मानपूर्वक देण्यात आली.

बँक कॉलनीतील रहिवासी गुलाबचंद हनुमानदास सारडा (वय ५६) यांच्या घरी झालेल्या मोठ्या घरफोडीचा तपास करत पोलिसांनी तब्बल ४९.८ तोळे सोने आणि १६०० ग्रॅम चांदी जप्त केली होती. हा सर्व मौल्यवान ऐवज सारडा यांना सुरक्षितपणे परत देण्यात आला. तसेच, राजीव नगर परिसरातील निवृत्ती पार्क येथे राहणारे प्रमोद भारत चिवडे (वय ३०) यांच्या लॅबमधून चोरीला गेलेली ३३ हजार रुपयांची रोख रक्कमही पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना पुन्हा मिळाली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या संपूर्ण तपासाचे व कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक सुचिता केदार, पोलीस नाईक तेजस वाव्हळे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे आणि पोलीस अंमलदार हनुमंत चादर या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. चोरीला गेलेली आयुष्यभराची कमाई परत मिळाल्याने नागरिकांनी अंबाजोगाई पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.