अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका गीतांजली शिवाजीराव माने (लोमटे) यांनी इंग्रजी साहित्यात प्रतिष्ठेची पीएचडी पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकतीच त्यांच्या बहुमोल संशोधन प्रबंधाला मान्यता देऊन ही पदवी अधिकृतपणे बहाल केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल अंबाजोगाई शहर आणि परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. गीतांजली यांनी आपला संशोधन प्रबंध "द डेलिनेशन ऑफ वुमन सायकी इन सिलेक्ट नोव्हेल्स ऑफ प्रीती शेनॉय: अ थेमॅटिक स्टडी" (प्रीती शेनॉय यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील स्त्री-मनाचे चित्रण: एक आशयात्मक अभ्यास) या विषयावर सादर केला होता. हे सखोल संशोधन त्यांनी डॉ. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. प्रा. माने यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत भक्कम असून, त्यांनी इंग्रजी, राज्यशास्त्र आणि हिंदी या तीनही विषयांमध्ये पदव्युत्तर (एम.ए.) शिक्षण पूर्ण केले आहे.
या कौतुकास्पद यशाबद्दल प्रा. गीतांजली माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या यशाचे संपूर्ण श्रेय मार्गदर्शक डॉ. सुनील पवार यांच्यासह आई-वडील शिवाजीराव व सुक्षमबाई माने, आणि सासू-सासरे कल्याणराव व सुनंदा लोमटे यांना जाते. त्यांच्या या वाटचालीत कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य डॉ. आर. शिंदे, प्रा. चांदणे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद राजपंखे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या यशाचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!