केज: केज शहरातून गहाळ झालेला तब्बल ७० हजार रुपये किमतीचा आयफोन केज पोलिसांच्या डीबी पथकाने तांत्रिक तपासाच्या जोरावर शोधून काढला असून, तो मूळ मालकाकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला आहे. मोबाईल परत मिळाल्याने मालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

केज येथील एका व्यक्तीचा महागडा आयफोन काही दिवसांपूर्वी गहाळ झाला होता. त्याने केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली. मोबाईलची किंमत जास्त असल्याने संबंधित व्यक्ती मोठ्या चिंतेत होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तात्काळ डीबी पथकाला मोबाईलचा तपास करण्याचे आदेश दिले.

आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्या नेतृत्वाखाली पथक कामाला लागले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, संतोष गित्ते, नितीन वारे, राहुल तरकसे, देवगुडे यांचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने CEIR या केंद्रीय प्रणालीचा वापर केला. मोबाईलचा IMEI नंबर ट्रेसिंगला टाकून त्याचे लोकेशन आणि वापर याबाबत तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर गहाळ झालेला आयफोन शोधून हस्तगत करण्यात पथकाला यश आले.

आयफोन मूळ मालकाला परत दि. २० नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या हस्ते हा आयफोन मूळ मालकाला परत करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्यासह डीबी पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोबाईल हरवला तर घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन यावेळी केज पोलिसांनी केले. केज पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.