केज: गावातील भूजल पातळी वाढवून पिंपळगव्हाण पाणीदार बनवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘जलतारा भूजल पुनर्भरण प्रकल्पाचा’ उद्घाटन सोहळा शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. 'विकसित भारत जी राम जी' योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.

"पाणी आडवा, पाणी जिरवा - आपले गाव पाणीदार बनवा!" या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला जात आहे. उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना नंदकिशोर मुंदडा यांनी ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या सोहळ्यास उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे, केजचे तहसीलदार अशोक भंडारे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी अभिमान राठोड यांनी प्रमुख उपस्थिती लावून ग्रामस्थांना जलतारा जलसंधारणाचे महत्त्व आणि तांत्रिक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विस्तार अधिकारी विजय मस्के, रोडेवार, कृषी विस्तार अधिकारी भूतपल्ले, मंडळ अधिकारी वर्षा देशमुख, मुख्याध्यापक गणेश जगताप, ग्राम महसूल अधिकारी शेख, कृषी सहाय्यक बिक्कड, एपीओ भोसले, एआरटी संस्थेचे तालुका समन्वयक वली तांबोळी, ज्योती सांबरे, दहिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाकळे, तांत्रिक अधिकारी रितेश गर्जे, सुधीर मुंडे, तेजस कदम, सीडीईओ राजू सानप आणि अर्जुन धन्ने आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सरपंच सचिन गायकवाड यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच सचिन राजेभाऊ गायकवाड, उपसरपंच शेलाजी घोळवे, ग्रामपंचायत अधिकारी ए. एम. शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामरोजगार सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पिंपळगव्हाण येथील ग्रामस्थ आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.