बीड - राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेतून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि आधुनिक सिंचन पद्धतीला चालना देण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत देत आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या एकत्रित लाभातून शेतकऱ्यांना एकूण 90 टक्के अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 55 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 10 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान दिले जाईल. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 45 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30 टक्के आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 15 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान मिळेल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावेत, असेही कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!