केज : नियमांचे उल्लंघन करत बसच्या इंजिनच्या बॉनेटवर बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका कथित एसटी कर्मचाऱ्याने कर्तव्यावरील एसटी चालकाला गच्चीला धरून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार केज येथे घडला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराची शेगाव–पंढरपूर ही एसटी बस (क्र. एमएच १४ / एमएच ३००१) शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास केज येथून पंढरपूरकडे रवाना झाली होती. केजमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बसमध्ये चढलेला एक प्रवासी थेट चालक शेजारील इंजिनच्या बॉनेटवर जाऊन बसला. बस अवघी २०० मीटर पुढे गेल्यानंतर चालक शिवाजी गोवर्धन राठोड यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याला बॉनेटवरून उठून व्यवस्थित बसण्यास सांगितले.

ओळखपत्र दाखवून घातला वाद

चालकाने हटकताच संबंधित व्यक्तीने आपण एसटी महामंडळाचे स्टाफ कर्मचारी असल्याचे सांगत 'जाधवर' असे नाव असलेले ओळखपत्र दाखवले. इतकेच नव्हे तर त्याने चालक शिवाजी राठोड यांच्या गच्चीला धरून धक्काबुक्की केली. "तू केज सोडून दाखव, पन्नास तरुण जमा करून तुला जीवे मारून टाकीन, तुझा पत्ताही लागणार नाही," अशी धमकी देत संबंधित व्यक्तीने चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकारानंतर चालक शिवाजी राठोड यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून संबंधित कथित कळंब आगार कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११५(२), १३२, ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा (गु. र. नं. ७२४/२०२६) नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने पुढील तपास करत आहेत.

'तो' जाधवर नेमका कोण? प्रशासनाची भूमिका

दरम्यान, संबंधित व्यक्ती कळंब आगाराचा कर्मचारी असल्याचा दावा केला जात असल्याने कळंब आगार व्यवस्थापक घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या आगारात 'जाधवर' आडनावाचे अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या घटनेतील संबंधित व्यक्ती नेमकी कोण आणि ती खरोखरच महामंडळाची कर्मचारी आहे की नाही, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.