बीड - बीड जिल्ह्यातील यंदाची भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान लक्षात घेता राज्य शासनाकडून  रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यासाठी 20 हजार रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्सची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी विहित वेळेत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट वितरण योजना राबविण्यात येत आहे. कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीत तग धरणारे सुधारित ज्वारी वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारे हे बियाणे मिनीकिट 4 किलोग्रॅम वजनाचे असेल. यामध्ये प्रक्रिया केलेले सुधारित ज्वारीचे बियाणे, जैविक खताची पाकिटे आणि पीक लागवड विषयक तांत्रिक माहितीपत्रक यांसारख्या आवश्यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरील mahadbt.maharashtra.gov.in फार्मर लॉगिनचा वापर करावा. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला krishi.maharashtra.gov.in भेट द्यावी. तसेच आपल्या गावातील संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.