अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव शिवारातील गट नंबर 519 मध्ये आज शनिवारी दुपारी शेतातील वीज रोहित्रावर (डीपी) अचानक आग लागल्याने संजय हनुमंतराव साळुंके यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. तोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत जळून गेल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

दुपारच्या सुमारास शेतातील डीपीवर अचानक जाळ झाला आणि त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे उभ्या उसाला आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाच एकर क्षेत्रातील संपूर्ण ऊस पीक भस्मसात झाले. आधीच दुष्काळाच्या तीव्र माऱ्यामुळे हतबल झालेल्या बळीराजाच्या पदरी आता या आगीने पुन्हा एकदा निराशाच टाकली आहे.

वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आणि डीपीच्या देखभालीअभावी अशा घटना वारंवार घडत असल्याचा संताप परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.