अंबाजोगाई : बसमध्ये चढण्याच्या गडबडीत अंबाजोगाई बसस्थानकावर हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली पर्स अंबाजोगाई शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर शोधून महिलेला सुखरूप परत केली आहे. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील पूजा गजानन भांगरे या दिवाळीनिमित्त अंबाजोगाई येथे वडिलांकडे आल्या होत्या. गावी परतताना बसस्थानकावर त्यांची दागिने आणि मौल्यवान वस्तू असलेली पर्स विसरून राहिली. लक्षात येताच त्यांनी पतीसह अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका ८० ते ८५ वर्षीय वृद्धाने ती पर्स उचलल्याचे दिसले. फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी पर्समधील मोबाईलचे लोकेशन तपासले, तेव्हा ते बर्दापूर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बर्दापूर येथे जाऊन संबंधित वृद्धाकडून पर्स ताब्यात घेतली.
पर्समध्ये सोन्याचे मिनी गंठण, मंगळसूत्र, बदाम, कानातील दागिने, मोबाईल आणि घड्याळे असा एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. तो आज पूजा भांगरे यांना परत करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे आणि पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बदाम आरसूळ व पोलीस नाईक तेजस वावळे यांनी पार पाडली. प्रवासात नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि काही हरवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!