बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरालगत असलेल्या डक पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (२० नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत दुचाकीस्वार प्रल्हाद गायकवाड (रा. मंगरूळ नंबर २) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघात इतका भीषण होता की प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच करुण अंत झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीला तातडीने माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. भरदुपारी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मंगरूळ गावासह संपूर्ण माजलगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.