अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषदेचे निवृत्त अधीक्षक आणि दासोपंत संशोधन मंडळाचे अध्यक्ष अरूण दिगंबरराव देशपांडे (हरबाजी, वय ७९) यांचे शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अंबाजोगाईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अरूण देशपांडे यांनी अंबाजोगाई नगर परिषदेत अधीक्षक म्हणून दीर्घकाळ प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवा बजावली होती. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांना ऐतिहासिक व धार्मिक संशोधनाची विशेष आवड होती. दासोपंत संशोधन मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संत दासोपंत यांच्या साहित्याचा व कार्याचा प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क होता.

शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार

त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई येथील नृसिंह तीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, भाऊ, बहिणी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शहरातील विविध स्तरांतून तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.