परळी: फेसबुकवर स्वस्तात साडी खरेदी करण्याच्या आमिषाला बळी पडून एका ७१ वर्षीय महिलेची तब्बल ८ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात सायबर भामट्याने ऑनलाईन साडीची ऑर्डर अडकल्याचे सांगून या वृद्धेची आर्थिक फसवणूक केली आहे.

कलावती बाळासाहेब खरबड (वय ७१, राहणार गणेशपार रोड, मॉडर्न कॉलेजच्या बाजूला, परळी) असे फसवणूक झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. कलावती यांनी फेसबुकवर एका साड्यांच्या कलेक्शनची जाहिरात पाहिली होती. त्यांनी दिलेल्या संपर्कावर कॉल करून केवळ सहाशे रुपयांत दोन साड्यांची ऑर्डर नोंदवली होती. मात्र, काही दिवसांनी साड्या न आल्याने त्यांनी विचारणा केली असता, अज्ञात आरोपीने पार्सल अडकल्याचे सांगून जीएसटी आणि इतर चार्जेसच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली. आरोपीने वेळोवेळी विविध कारणे सांगून कलावती यांना त्यांच्या बँक खात्यांतून तब्बल ८ लाख ६४ हजार ९२४ रुपये पाठवण्यास भाग पाडले.

आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कलावती खरबड यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध बीड सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे करीत आहेत.