परळी: शहरातील पंचशील नगर बसस्थानकाजवळील 'साई पॅलेस लॉज'मध्ये सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) रात्री पावणे अकराच्या सुमारास धडक कारवाई केली. अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या या छाप्यात रोख रक्कम, महागड्या गाड्या आणि मोबाईल असा तब्बल २९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, लॉज मॅनेजरसह एकूण ११ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
साई पॅलेस लॉजच्या रूम नंबर ५०९ मध्ये लॉजचा मॅनेजर चंद्रकांत राऊत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कमिशन घेऊन 'तिर्रट' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा मारला. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, २ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम, विविध कंपन्यांचे १० मोबाईल, दोन स्कूटी, साडेतीन लाखांची एक रॉयल एनफिल्ड बुलेट आणि १५ लाख रुपये किमतीची एक काळी स्कॉर्पिओ गाडी असा एकूण २९ लाख ६० हजार रुपयांचा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सर्व ११ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये भागवत बाबासाहेब मुंडे (रा. भोपला), गंगाधर शंकर फड (रा. धर्मापुरी), बिभीषण सुधाकर भालेकर (रा. अंबाजोगाई), नवनाथ वैजनाथ फड (रा. धर्मापुरी), शेख निजाम शेख दगडू (रा. अंबाजोगाई), राहुल सुभाष मुंडे (रा. परळी), अमोल लक्ष्मण पौळे (रा. अंबाजोगाई), दत्तात्रय वामनराव दुंदुले (रा. परळी), नामदेव नागनाथ बदने (रा. परळी), लॉज मॅनेजर चंद्रकांत रामराजा राऊत (रा. अंबाजोगाई) आणि दिनेश करपे (रा. अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. या सर्वांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनमोल केदार, सपोनि गोंड, सपोनि गट्टुवार, उपनिरीक्षक पुजरवाड, उपनिरीक्षक राठोड आणि अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने मोठा सहभाग नोंदवला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड हे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!