परळी वैजनाथ: टाटा कंपनीचा चौदा टायरचा ट्रक खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून बनावट अधिकारी बनून ५ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोकवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील विटभट्टी व्यावसायिक राजाभाऊ बालासाहेब मुंडे (वय ३९) यांना व्यवसायासाठी ट्रक खरेदी करायचा होता. त्यांच्या चुलत्यांनी आतिष रामचंद्र वाल्मिकी (वय ४५, रा. परळी वैजनाथ, मूळ रा. खेड, जि. रत्नागिरी) आणि आशिष तुळशीदास दोडके (वय ४२, रा. पालघर) यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. आशिष दोडके याने स्वतःला टाटा कंपनीचा मोठा अधिकारी भासवून मुंडे यांचा विश्वास संपादन केला.
या दोघांनी ट्रकचे फायनान्स आणि डाऊन पेमेंटच्या बहाण्याने ११ जुलै २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंडे यांच्याकडून धनादेश, रोख रक्कम आणि युपीआयद्वारे एकूण ५ लाख ४४ हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे ट्रक न देता आणि रक्कमही परत न करता त्यांनी मुंडे यांची फसवणूक केली. आरोपींनी आपले संपर्क क्रमांकही बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुंडे यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी राजाभाऊ मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष दोडके आणि आतिष वाल्मिकी या दोघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश ज्ञानेश्वर निमोणे हे करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!