अंबाजोगाई - दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच अंबाजोगाई तालुक्यावर भीषण दुष्काळाचे काळे सावट पसरले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा सुरुंग लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पिके करपून गेली, तर दुसरीकडे शासनाची अग्रिम मदत आणि दुष्काळी अनुदान अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यातच रेशन दुकानांवर मिळणारा 'आनंदाचा शिधा' अद्याप न पोहोचल्यामुळे तालुक्यातील हजारो कुटुंबांचा सणाचा आनंद हिरावला गेला असून, अंबाजोगाई शहरातील मुख्य बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

बाजारपेठा सजल्या, पण ग्राहक गायब

शहरातील मंडी बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परळी वेस परिसरातील मुख्य रस्त्यांवर व्यावसायिकांनी आकाशकंदील, मातीच्या पणत्या, रांगोळीचे रंग, विद्युत रोषणाईचे साहित्य आणि फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. व्यापाऱ्यांनी पुणे आणि मुंबईच्या घाऊक बाजारातून लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून सजावटीचे साहित्य मागवले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावरही बाजारात शुकशुकाट आहे. वस्तूंचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढले असले, तरी मुख्य अडचण ग्राहकांच्या खिशातील पैशांची आहे. तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण भांडवल वाया गेल्याने बाजारातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

खरीप हंगामात पेरणीपासून ते खतांपर्यंत शेतकऱ्यांनी पदरमोड करून गुंतवलेले कोट्यवधी रुपये पावसाअभावी मातीत मिसळले आहेत. उत्पादन तर सोडाच, खर्चही न निघाल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न उभा राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. खिशात पैसा नसल्याने यंदा ग्रामीण भागातील जनतेला केवळ परंपरेचे पालन म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने, कोरड्या डोळ्यांनी दिवाळी साजरी करावी लागत आहे.