अंबाजोगाई: तालुक्यातील वरवटी गावाची उदयोन्मुख जलतरणपटू सिद्धी लक्ष्मीकांत चाटे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ग्रामीण भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिद्धीने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात खेळताना सिद्धीने १०० मीटर आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तसेच, १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात तिने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे वरवटी गावासह संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत मिळवलेल्या या मोठ्या यशाबद्दल अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते सिद्धीचा सन्मानपूर्वक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गोविंदभाऊ उघडे, तिचे चुलते उमाकांत चाटे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून या जलकन्येला तिच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!