परळी वैजनाथ येथील एका शेतकऱ्याला कर्ज नसलेली गाडी देत असल्याचे भासवून कार्स २४ कंपनी आणि त्यांच्या डीलरने तब्बल ११ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीतील पद्मावती गल्लीत राहणारे शेतकरी मुकेश जयप्रकाश काबरा यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. काबरा यांनी एप्रिल महिन्यात कार्स २४ चे डीलर दीपक झंवर (रा. बिबवेवाडी, पुणे) यांच्याकडून किया सेल्टॉस (MH 20 FY 2255) ही सेकंड हँड कार विकत घेण्याचे ठरवले होते. या कारवर कोणतेही कर्ज नसल्याचा विश्वास झंवर यांनी त्यांना दिला. यावर विश्वास ठेवून काबरा यांनी ११ लाख ५२ हजार रुपये आरटीजीएसद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा केले.
पैसे भरल्यानंतर गाडी त्यांना मिळाली, परंतु या गाडीवर छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड अर्बन बँकेचे कर्ज असल्याचे समोर आले. बँकेचा बोजा असल्यामुळे ही कार अद्याप काबरा यांच्या नावावर होऊ शकलेली नाही. जाणीवपूर्वक माहिती लपवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी दीपक झंवर व कार्स २४ वर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३१६ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!