गेवराई: येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन लाचखोर पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अखेर बेड्या ठोकल्या आहेत. एका रिक्षा चालकाकडून त्याची जप्त केलेली सीएनजी रिक्षा सोडवण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सहायक फौजदार आणि पोलीस हवालदाराला गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
गेवराई पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन संतराम शिंदे (वय ४८) आणि पोलीस हवालदार रामराव केशव आघाव (वय ४६) अशी या दोन भ्रष्ट पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार ३४ वर्षीय रिक्षा चालकाने नव्याने घेतलेली सीएनजी रिक्षा पासिंग न करता चालवल्याने ती गेवराई पोलिसांनी जप्त करून ठाण्यात लावली होती. ही रिक्षा सोडवून देण्याच्या मोबदल्यात १७ सप्टेंबर रोजी हवालदार आघाव याने उपनिरीक्षक शिंदे याच्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. शिंदे यांनीही पंचांसमक्ष ही लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते.
लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला होता, मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराला भेटण्याचे टाळले. अखेर ठोस पुराव्यांच्या आधारे गुरुवारी दुपारी एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने दोन्ही लाचखोर पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!