अंबाजोगाई: शहरात ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे कायदेशीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत शहरात विविध चर्चा आणि गैरसमज पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गो. प्र. स्वामी यांनी रविवारी (१ नोव्हेंबर) एक अधिकृत पत्रक काढून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांच्या हितास्तव ही धडक कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६, महाराष्ट्र युडीसीपीआर २०२० आणि नगरविकास विभागाच्या ५ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसारच राबवण्यात आली आहे. रस्त्यांच्या हद्दीबाबत मंजूर विकास आराखडा आणि बांधकाम परवानग्यांच्या अटींच्या अधीन राहूनच कायदेशीर प्रक्रियेनुसार सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.

त्यामुळे समाजमाध्यमांवर कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये आणि जनतेमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत, असे प्रशासनाने बजावले आहे. अंबाजोगाई शहराच्या सार्वजनिक विकासासाठी राबवलेल्या या मोहिमेत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती बांधकाम विभागाने केली आहे.