अंबाजोगाई : संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या 'आधार माणुसकीचा' उपक्रमांतर्गत बीडसह परिसरातील अकराशे वंचित व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ आणि माहेरची साडी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. हा भव्य वितरण सोहळा शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीड रस्त्यावरील विवान्स सायली मंगल कार्यालयात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सिंधू कापरे, प्रा. रोहिणी पाठक, लातूरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निहारीका नागरगोजे, आदर्श शिक्षिका शीतल बोधले, शोभा खडकभावी, अर्चना सोळंके, रजनी देशमुख, रूपाली काकडे, मोनिका मुंदडा आणि स्वाती मोदी आदी मान्यवर उपस्थित राहतील.

वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा संकल्प

हा सामाजिक उपक्रम पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ, ठाणे येथील विद्यार्थी विकास योजना, ज्ञानेश्वर मुळे यांची चांगुलपणाची चळवळ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या लोकसहभागातून आकारास आला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, कर्ता पुरुष गमावलेली कुटुंबे तसेच कोविड व कर्करोगग्रस्त अशा अत्यंत गरजू घटकांची निवड यासाठी करण्यात आली आहे. या सर्व अकराशे कुटुंबांना प्रत्येकी अडीच किलो रुचकर फराळ, तर भाऊबीज भेट म्हणून एक हजार महिलांना माहेरची साडी प्रदान केली जाईल.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली फराळ निर्मितीची पूर्वतयारी आता पूर्ण झाली आहे. या स्तुत्य उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'आधार माणुसकीचा' उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांच्यासह रामकृष्ण पवार, चंद्रशेखर शिंदे, रवींद्र लोमटे, बळीराम जोगदंड, अनंत निकते आणि आधार माणुसकी परिवाराने केले आहे.