अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेअंतर्गत या निधीला ६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या इमारतीमुळे नागरिकांची मोठी सोय होणार असून, आ. नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.   

सध्याची इमारत अत्यंत गैरसोयीची

सध्याची नगर परिषदेची इमारत नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत आहे. याच इमारतीत व्यापारी संकुल असल्याने तिथे नेहमी प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे नागरिकांना पार्किंगची मोठी अडचण भेडसावते. पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत कार्यालयात जावे लागते. तसेच, कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांगांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्याच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी अपुरी जागा असून काही विभागांना तर जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचारी दाटीवाटीने बसतात आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नाही. 

या सर्व वाढत्या गैरसोयी लक्षात घेऊन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या सततच्या प्रयत्नांची दखल घेत शासनाने इमारतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे १० कोटी रुपये अपेक्षित आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या या प्रकल्पाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचाच राहणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या विकासकामाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून अंबाजोगाई नगर परिषद काम पाहणार आहे.  

नवीन इमारत सुटसुटीत आणि सुविधायुक्त

नवीन प्रशासकीय इमारत अत्यंत सुटसुटीत आणि तंत्रशुद्ध असणार आहे. यामध्ये पार्किंगची प्रशस्त सोय, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय, तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासाठी अँटी चेंबरसह अद्ययावत स्वतंत्र केबिन उभारण्यात येतील. यासोबतच विधिमंडळाच्या धर्तीवर भव्य मीटिंग हॉल, अभ्यागतांसाठी बसण्याची सोय आणि प्रसाधनगृहे यांसारख्या आधुनिक सुविधा या इमारतीत असतील. भविष्यातील गरजांचा विचार करून ही अद्ययावत व सुविधायुक्त इमारत उभारली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिली. मागणीला प्रतिसाद देत निधी उपलब्द करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आभार मानले आहेत.