मुंबई: मराठवाड्यातील वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महत्त्वाकांक्षी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाला गती देत याचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तातडीने अपलोड करून केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे पाठवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जायकाच्या (JICA) वरिष्ठ शिष्टमंडळासमवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात ४ जिल्हे आणि ६ प्रमुख धरणे जोडणार

मराठवाड्यातील पाण्याचे असमान वितरण दूर करण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांतून दुष्काळी पट्ट्यातील धरणांपर्यंत बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचवले जाईल. यासाठी दुहेरी प्रवाहाची (Dual Flow) व्यवस्था करण्यात येणार आहे.

  • समाविष्ट जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव.

  • जोडली जाणारी धरणे: जायकवाडी, माजलगाव, मांजरा, उजनी, निम्न तेरणा आणि निम्न मनार.

  • पायाभूत सुविधा: ३,०९५ किलोमीटर लांबीच्या मुख्य व दुय्यम पाइपलाइन तसेच १५ अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी.

  • थेट लाभ: पहिल्या टप्प्यातून सुमारे १ कोटी नागरिकांना थेट पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे.

जपानचे प्रगत भूकंपरोधक तंत्रज्ञान

संपूर्ण आठ जिल्ह्यांसाठीच्या वॉटर ग्रीड प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे २५,०५६ कोटी रुपये आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (JICA) सुमारे २०,००० कोटी रुपयांच्या कर्जसहाय्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लातूर आणि धाराशिव हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने जपानचे प्रगत भूकंपरोधक तंत्रज्ञान, डक्टाईल आयर्न पाइप्स, आधुनिक पंपिंग यंत्रणा आणि SCADA प्रणालीचा वापर करण्यात येईल. या प्रकल्पामुळे ऑरिक सिटी, शेंद्रा-बिडकीन व वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे.

२०२९ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे लक्ष्य

प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया जायकाच्या सहकार्याने वेगाने पूर्ण केली जाणार असून, २०२९ पर्यंत प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, AVGC (अॅनिमेशन, गेमिंग) क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जपानी कंपन्यांच्या सहकार्याने फेब्रुवारीत मुंबईत 'मांगा कारवान' आयोजित केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस उपस्थित मान्यवर:

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, विकास चंद्र रस्तोगी, तसेच जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो आणि जायका इंडियाचे मुख्य प्रतिनिधी ताकुरो ताकेउची यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.