परळी - दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची होणारी वाढती गर्दी आणि संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाईच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट थांबावी आणि प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

जादा भाडे आकारणी व नियमभंग करणाऱ्यांवर नजर

सध्या सुरू असलेल्या मोहिमेत खासगी ट्रॅव्हल्स व बसेसकडून प्रवाशांची होणारी जादा भाडे आकारणी, परराज्यात नोंदणी असलेल्या प्रवासी वाहनांची तपासणी, बसमधून होणारी अनधिकृत मालवाहतूक तसेच रस्ता सुरक्षेच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू नये व नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी भरारी पथके रस्त्यावर उतरली आहेत.

कारवाईत अधिकाऱ्यांचा सहभाग व प्रशासनाचे आवाहन

या विशेष तपासणी मोहिमेत परिवहन अधिकारी विजयसिंह भोसले, निलेश पाटील, शुभम लवळे यांच्यासह चालक महादेव फड आणि मुश्ताक मोमीन यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन ही कारवाई केली. दिवाळीच्या काळात सर्व वाहनधारकांनी प्रवासी वाहतुकीचे नियम पाळावेत, प्रवाशांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा भाडे वसूल करू नये आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.