राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत म्हटले आहे की, जर अजितदादा आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एकत्र दिसले असते. अजित पवारांच्या निधनामुळे विलिनीकरणाची ही चर्चा मागे पडली असली तरी, १२ फेब्रुवारी या तारखेला दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असते, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

नुकतेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. आपण राजकीयदृष्ट्या दुरावलो असलो तरी मनाने नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते. तटकरेंच्या या दाव्याला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे. पक्ष ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही अपेक्षित होते, असे शिंदे म्हणाले.

गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीने केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी, अर्थ खात्याची मागणी आणि आजारपणाच्या काळात शरद पवारांच्या रुग्णालयातील भेटीगाठी पाहता, राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.