अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये यंदा विक्रमी वाढ झाली असून ३८ नव्या डॉक्टरांना उच्च वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) नुकतीच या वाढीव जागांना अधिकृत मंजुरी दिली असून, नीट-पीजी २०२६ च्या इन्स्टिट्यूट सीट इंटेक पोर्टलवर याबाबतची अधिकृत नोंद प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
विविध विभागांना मिळाली नवी ताकद
एनएमसीने दिलेल्या मान्यतेनुसार महाविद्यालयातील विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये या जागा वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये रेडिओडायग्नोसिस, फिजिओलॉजी आणि फार्माकॉलॉजी विभागात प्रत्येकी ५, तर जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र आणि पॅथॉलॉजी विभागात प्रत्येकी ४ जागा वाढल्या आहेत. याशिवाय रेस्पिरेटरी मेडिसीन (टीबी व छातीचे रोग) आणि ॲनाटॉमी विभागात प्रत्येकी ३ नव्या पदव्युत्तर जागांना मंजुरी मिळाली आहे.
रुग्णांवरील उपचारात होणार गतिमान सुधारणा
स्वाराती रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वरिष्ठ डॉक्टरांवर उपचारांचा प्रचंड ताण येत होता. महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांना चोवीस तास तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच जागा वाढल्या असून यामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल आणि रुग्ण सुधारणेचे प्रमाण अधिक वाढेल, असा विश्वास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी व्यक्त केला आहे.
आ. नमिता मुंदडा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
महाविद्यालयातील पदव्युत्तर जागा वाढवून मिळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार नमिता मुंदडा या सातत्याने प्रयत्नशील होत्या. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रशासकीय त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी समन्वय साधत केंद्र व राज्य पातळीवर प्रभावी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच वैद्यकीय महाविद्यालयाला हे मोठे यश मिळाले असून परिसरातील आरोग्य क्षेत्राकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!