अंबाजोगाई: बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'इस्रो' आणि 'नासा' शैक्षणिक सहलीच्या अत्यंत कठीण अशा जिल्हास्तरीय चाचणीत अंबाजोगाई तालुक्यातील तीन गुणवंत मुलींनी घवघवीत यश मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच १०० गुणांची चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. यात पुसच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी क्रांती सोनटक्के हिने ४३ गुण मिळवून तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला असून तिची 'नासा' आणि 'इस्रो' अशा दोन्ही सहलींसाठी निवड झाली आहे. तसेच, राडी शाळेची सिद्धी गंगणे (३८ गुण) आणि कुंबेफळ शाळेची सहावीची विद्यार्थिनी प्रतीक्षा थोरात (३७ गुण) या दोघींची 'कन्या राखीव' कोट्यातून इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील देशांतर्गत सहलीसाठी निवड झाली आहे.

या परीक्षेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील नासाची आणि पहिल्या तीन विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवली जाणार आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि सीईओ जितीन रहमान यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून, पुस येथे क्रांती सोनटक्के आणि तिच्या पालकांचा गावकऱ्यांनी नुकताच मोठा सत्कार केला आहे.