परळी वैजनाथ: पतीने बाहेरील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने एका पंचवीस वर्षीय विवाहितेने बाथरुम साफ करण्याचे ॲसिड पिऊन आत्महत्या केली. ही घटना परळी वैजनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर नगर येथे तीस ऑक्टोबर रोजी घडली.

या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील श्रीमंत पंढरी गित्ते (वय पंचावन्न, राहणार नंदागौळ, तालुका परळी वैजनाथ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती सुनील सुरेश बदने (राहणार सिद्धेश्वर नगर, परळी वैजनाथ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकन्या हिचा विवाह सुनील बदने याच्यासोबत दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता. काही वर्षे चांगली वागणूक दिल्यानंतर पतीने तिला दारू पिऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पतीचे बाहेरील महिलेशी संबंध असल्याचे समजल्यानंतर देवकन्याने ही बाब माहेरी सांगितली होती, मात्र नातेवाईकांनी समजूत काढूनही पतीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.

सततच्या भांडणाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून देवकन्या हिने राहत्या घरी ॲसिड प्राशन केले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एकतीस ऑक्टोबर रोजी तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार आरोपी पतीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे करीत आहेत.