अंबाजोगाई: शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांची होणारी कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याच्या धडक मोहिमेला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई नगर परिषद, महसूल आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तगड्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडणार आहे. शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही धडक कारवाई केली जाणार आहे.

नुकसानीला अतिक्रमणधारकच जबाबदार

रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवलेले डबे, अनधिकृत शेड, पत्रे, हातगाड्या आणि नाल्यांवरील अतिक्रमणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कारवाईपूर्वीच संबंधित व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास प्रशासनाकडून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने थेट कारवाई केली जाईल. या कारवाईदरम्यान मालमत्तेचे जे काही नुकसान होईल, त्याची जबाबदारी शासन स्वीकारणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्ते होणार मोकळे आणि सुरक्षित

अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा आणि गटारी तुंबल्यामुळे निर्माण होणारी गैरसोय यामुळे नागरिक त्रस्त होते. या मोहिमेमुळे पाण्याचा निचरा सुरळीत होऊन रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होणार आहेत. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि अतिक्रमणधारकांनी या कारवाईत कोणताही अडथळा निर्माण न करता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.