बर्दापूर - राष्ट्रीय महामार्गावरील सायगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात रात्रीच्या सुमारास घडला. रत्नदीप भीमराव गजधने (वय २९) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, गोविंद वाघमारे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पत्नी व चिमुकलीला भेटून परतताना काळाचा घाला

दिवाळी सणानिमित्त रत्नदीप यांची पत्नी माहेरी गेली होती. दीड वर्षांची चिमुकली मुलगी आणि पत्नीच्या भेटीसाठी रत्नदीप हे मामाच्या मुलासह (गोविंद वाघमारे) दुचाकीने गेले होते. भेट घेऊन घरी परतत असताना सायगाव शिवारात राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघाताच्या तीव्रतेमुळे रत्नदीप यांचा जागीच प्राण गेला, तर सोबत असलेला गोविंद गंभीर जखमी झाला.

रुग्णवाहिका तासभर उशिरा; ग्रामस्थांचा संताप

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी सय्यद असेंफोद्दीन रियाजुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका पाचारण केली; मात्र आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास उशीर झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली. आपत्कालीन यंत्रणेच्या या दिरंगाईबाबतचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बर्दापूर पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात वाहनाने कट मारून किंवा जोराची धडक देऊन पलायन केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नातेवाईकांचा अधिकृत जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत.