माजलगाव शहरातील दोन सराफ व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ४४ लाख ७ हजार ५०० रुपयांचे ३० तोळे शुद्ध सोने घेऊन कारागिरांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी महाराज चौकातील कल्पतरू ज्वेलर्सचे मालक रवी बालाप्रसाद मानधने यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असलेले आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे देवू सासमल, त्याची पत्नी सुमित्रा सासमल आणि सोन्याचा कारागीर सुदीप डोलाई यांनी त्यांच्याशी ओळख वाढवली. आपण आकर्षक दागिने बनवून देतो, असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांच्या मनात निर्माण केला.
यावर विश्वास ठेवून व्यापाऱ्यांनी कल्पतरू ज्वेलर्सचे सुमारे ३० लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचे २० तोळे ९ ग्रॅम शुद्ध सोने आणि न्यू सिद्धेश्वर ज्वेलर्सचे १३ लाख ७७ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ५ ग्रॅम सोने त्यांच्याकडे दिले. मात्र, दागिने न बनवता हे तिघेही आरोपी तब्बल ३० तोळे ४ ग्रॅम सोने घेऊन पसार झाले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मानधने यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!