अंबाजोगाई: टाळ-मृदंगाचा गजर, संतवाणीचा सुरेल आविष्कार आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात अंबाजोगाई येथील जागृती भजनी मंडळाने मंगळवारी सायंकाळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित विशेष भजनसेवेत आपली कला सादर केली. पंढरीच्या पावन भूमीत झालेल्या या भक्तिमय सादरीकरणाला उपस्थित भाविक, वारकरी आणि संगीतप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. मंदिर समितीच्या वतीने मंडळाच्या या भावपूर्ण सेवेचे विशेष कौतुक करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
स्थानिक मंचावरून थेट पंढरीच्या दरबारात झेप
नवरात्र महोत्सवात अंबाजोगाई आणि परिसरातील पंचक्रोशीत भजनांचे यशस्वी सादरीकरण करून रसिकांची मने जिंकणाऱ्या या मंडळाला थेट पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी सेवा रुजू करण्याची पर्वणी लाभली. संतांच्या विविध अभंगांचा भावस्पर्शी आविष्कार आणि वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा उलगडणाऱ्या या भजनसेवेमुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. या सादरीकरणामुळे जागृती भजनी मंडळाच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रवासात मानाचा तुरा रोवला गेला असून, अंबाजोगाई शहराचे नावही सांस्कृतिक पटलावर अधिक उंचावले आहे.
वादकांची सुरेल साथ आणि सांघिक एकजूट
या भजनसेवेत हार्मोनियमवर सोळंके गुरुजी यांनी, तर पखवाजावर घोटकर काका यांनी अप्रतिम साथसंगत करत कार्यक्रमात रंग भरला. तसेच श्री. जोशी काका आणि तपसे काका यांनी नियोजन व व्यवस्थापनासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्व सदस्यांच्या सांघिक परिश्रमातून पार पडलेल्या या उपक्रमाने महिलांची एकजूट, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि भक्तिपरंपरेचा प्रभावी संदेश पंढरीच्या दरबारात दिला.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!