केज: विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी समाजात बालविवाह थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केजच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एस. कुलकर्णी यांनी केले. साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत ‘पोक्सो’ (बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम २०१२) आणि बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना त्या बोलत होत्या.

न्यायालय आणि समाजाच्या समन्वयातून जनजागृती अभियान

न्यायाधीश कुलकर्णी यांनी पुढे बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने बालविवाह रोखण्यासाठी घेतलेला पुढाकार अतिशय महत्त्वाचा असून तळागाळापर्यंत याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. न्यायालयात येणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचा विचार करता, अशा अनिष्ट प्रथांना मुळापासून रोखण्यासाठी न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ‘सुरक्षित बचपन अभियान’ प्रभावीपणे राबवले जात आहे. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लैंगिक शोषण, बालविवाह व बालमजूर प्रतिबंधक कायद्यावर सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याचे त्यांनी मनमोकळे कौतुक केले.

सोशल मीडियाचा गैरवापर टाळा: सह दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. चव्हाण

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सह दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या माध्यमांवर आपले वैयक्तिक फोटो अपलोड करू नयेत; कारण मॉर्फिंग व हॅकिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगसारखे सायबर गुन्हे घडत आहेत. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी व अभ्यासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. बडगुजर, बालविवाह प्रतिबंध निर्मूलन समितीचे अध्यक्ष संतोष रेपे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. कविता गित्ते/कराड यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.