अंबाजोगाई / प्रतिनिधी - लहान बालकांना जन्मजात हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांवर वेळीच उपचार मिळावेत, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाचे उपचार थांबू नयेत, या सामाजिक जाणिवेतून घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया शाखा अंबाजोगाई, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (महाराष्ट्र शासन) आणि बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे मोफत बालहृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहर व परिसरातील एकूण १५२ बालकांची हृदय तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० बालकांना हृदयासंबंधी समस्या असल्याचे निदान झाले असून, १८ बालकांवर मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रेड्डी, एसएमएस पतसंस्थेचे चेअरमन नाथभाऊ रेड्डी, अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या शिबिरामध्ये मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. श्रीपाल जैन यांनी बालकांची टू डी इको व कलर डॉपलर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हृदय तपासणी केली. ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.
बालकांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी सामाजिक पुढाकार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नवनाथ घुगे यांनी केले. यावेळी त्यांनी रुग्णसेवेतील सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. घुगे हॉस्पिटलने आजवर संवेदनशीलतेने रुग्णसेवा करत हजारो महिला व पुरुष रुग्णांना उपचारांद्वारे मदत केली असून, अनेक रुग्णांना गंभीर आजारांतून बाहेर पडण्यासाठी सहकार्य केले आहे. मात्र, ज्या लहान बालकांना आपले दुखणे शब्दांत सांगता येत नाही, अशा बालकांच्या हृदयाची काळजी घेण्याची जबाबदारीही समाजाने स्वीकारली पाहिजे, या भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने यापूर्वीही दोन वेळा अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांतील बालकांना मोफत तपासणी आणि उपचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात हृदयविकाराचे निदान झालेल्या पात्र बालकांवर मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. घुगे यांनी स्पष्ट केले.
गरीब कुटुंबांसाठी आरोग्यसेवेची मोठी संधी
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या मनोगतात डॉ. नवनाथ घुगे आणि रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील गरीब व गरजू घटकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे गरीब कुटुंबांना आपल्या बालकांवर आवश्यक उपचार करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत डॉ. नवनाथ घुगे आणि डॉ. श्रीपाल जैन यांनी अंबाजोगाईत मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देऊन गरजू कुटुंबांना मोठा आधार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. श्रीपाल जैन आणि पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनीही मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर निदान आणि योग्य उपचार किती महत्त्वाचे आहेत, हे अशा शिबिरांमधून अधोरेखित होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
७० बालकांना हृदयविकाराचे निदान; १८ बालकांवर शस्त्रक्रिया
या शिबिरातील तपासणीचे निष्कर्ष महत्त्वपूर्ण ठरले. एकूण १५२ बालकांची हृदय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० बालकांना हृदयासंबंधी समस्या असल्याचे निदान झाले, तर १७ बालकांची तपासणी सामान्य असल्याचे आढळले. याशिवाय १८ बालकांवर मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गरजू बालकांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. राहुल गुट्टे,डॉ.राहुल वरोडे,डॉ.संजय पुजदेकर,डॉ.कमलाकर साखरे,डॉ.पांडुरंग बोन्द्रे,डॉ.प्रदीप देशमुख,डॉ.स्वाती जावळे,डॉ.सीमा काशीद,डॉ.सारिका बारहाते,डॉ.दीपाली मोहेंकर,डॉ.श्रद्धा लातूरकर,डॉ.प्रतिमा घरत,डॉ.बालाजी फड,डॉ.अमोल दुबे,प्रतिभा परळकर,कामिनी केंद्रे,सोनी मोगरे,आशालता मुंडे पूजा खाडे ,खरटमोल सिस्टर,सचिन वाळके,गोविंद फड आदींनी सहभाग नोंदवून रुग्णसेवेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष मोहिते यांनी केले, तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक रमेश तांगडे यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष शेख शकील बागवान, सचिव राधेश्याम लोहिया, रो व जेष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर, रो रोहिणी पाठक, रो कल्याण काळे, रो प्रवीण चोकडा, रो बालाजी घाडगे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी बालरुग्णांचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!