परळी बसस्थानकात एका वृद्ध प्रवाशाला दगडाचा रुद्राक्ष करून देण्याचा चमत्कार दाखवण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बेड्या ठोकल्या आहेत. या भामट्याकडून एक लाख सात हजार रुपये किमतीची चोरीला गेलेली सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे.

परळी तालुक्यातील हेळंब येथील वयोवृद्ध गणपत लक्ष्मण आंधळे हे २८ सप्टेंबर रोजी दुपारी परळी बसस्थानकात उभे होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातात खडा देऊन त्याचा रुद्राक्ष करून दाखवतो अशी बतावणी केली आणि हातचलाखीने त्यांच्या बोटातील दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी हातोहात लंपास केली. याप्रकरणी परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीवरून हा गुन्हा नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सराईत गुन्हेगार अफजल नवाब मदारी (वय २५) याने केल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट नाशिकमधील येवला गाठून या भामट्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली अंगठी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.