माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर शिवारात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील ५ एचपी क्षमतेची सौर ऊर्जेवर चालणारी पाणबुडी मोटार आणि २० फूट वायर चोरून नेली आहे. या चोरीमुळे पिकांना पाणी देणे अवघड बनले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गोविंदपूर येथील शेतकरी शिवाजी तात्याराव कुंडकर यांच्या शेतात सद्भाव कंपनीची ३० हजार रुपये किमतीची सौर पाणबुडी मोटार बसवण्यात आली होती. ११ ते १२ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील मोटार व केबल वायर चोरून नेली. सकाळी शेतात आल्यानंतर शेतकऱ्याला हा प्रकार समजला. शिवाजी कुंडकर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सोनवणे तपास करत आहेत.