केज - केज-कळंब रस्त्यावरील साळेगाव शिवारात ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरसह दोन कारचा भीषण तिहेरी अपघात झाला. शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालकासह कारमधील एकजण गंभीर जखमी झाले असून तिन्ही वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. जखमींवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने विचित्र धडक

बीड तालुक्यातील हिवरा पहाडी येथील ऊसतोड मजुरांचे ट्रॅक्टर कळंब परिसरातील साखर कारखान्याकडे जात होते. साळेगाव येथील पोतदार लर्न इंग्लिश स्कूलजवळ मागून येणाऱ्या फोर्ड कारने (क्र. MH 23 AS 2333) ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थेट ट्रॅक्टरच्या पुढील भागाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर ही कार रस्त्यावर आडवी झाली असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगन आर कारने (क्र. MH 44 Z 5684) रस्त्यावरील अपघातग्रस्त कारला जोरदार धडक दिली. या भीषण तिहेरी अपघातात ट्रॅक्टरचालक अनिकेत राजेंद्र शेळके (वय २०, रा. हिवरा पहाडी) आणि अशोक विठ्ठल शिंदे (रा. कळंब, जि. धाराशिव) हे दोघे गंभीर जखमी झाले.

पोलिसांची तत्परता, वाहतूक केली सुरळीत

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण व सहकारी अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर आडवी झालेली वाहने बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथे शिंदे यांच्या नातेवाईकांनी ट्रॅक्टरचालक अनिकेत शेळके यास धक्काबुक्की केल्याची घटना घडल्याचे समजते. या अपघाताचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.