अंबाजोगाई / पानगाव : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील विमलनगर येथे असलेल्या पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेडच्या सन २०२६-२७ च्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार नमिता मुंदडा, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडायांच्यासह उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणपूजन आणि मोळीपूजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये पहिला हप्ता देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे.   

यंदाच्या हंगामासाठी कारखान्यात सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्च करून नवीन बॉयलर बसवण्यात आला आहे. याशिवाय नवीन पाईपलाईन, वजनकाटे आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कारखान्याने १ लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केले होते, ज्यामध्ये एकट्या रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा होता. नवीन तांत्रिक बदलांमुळे यंदा गाळपाची क्षमता अधिक वाढणार असून शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होईल, असा विश्वास अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना वेळेत मिळायला हवेत, या उद्देशाने ऊस घातल्यानंतर पहिल्या आठवड्यातच ३ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी ग्वाही मुंदडा यांनी दिली. तसेच, कारखान्यातील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्यास खपवून घेतले जाणार नाही, शेतकऱ्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी सक्त ताकीद त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. बैलगाडी आणि ट्रान्सपोर्टची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून यंदाचा हंगाम पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा संकल्प कारखान्याकडून करण्यात आला आहे. लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे हित ध्यानात घेऊन हा कारखाना सुरु केला होत. त्यांच्या आणि स्व. विमलताई मुंदडा यांचा शेतकरी उन्नतीचा आदर्श समोर ठेउनच या कारखान्याची वाटचाल सुरु राहील असे अक्षय मुंदडा यांनी आश्वस्त केले. 

याप्रसंगी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष महादू मस्के, राजूसेठ भन्साळी, भाजपा केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, नेताजी पापा शिंदे, बालासाहेब दोडतले, शरद इंगळे, गोकुळ कदम, माजी सभापती विलास सोनवणे, मधुकर काचगुंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. जयसिंग चव्हाण, नूर पटेल, सुदाम पाटील, भाजपा किसान सेलचे अध्यक्ष हिंदूलाल काकडे, नगरसेवक संजय गंभीरे, गणेश देशमुख, महेश अंबाड, किरण भालेकर, मुस्तकिन बागवान, संतोष काळे, महादेव आदमाने, श्रीकांत धायगुडे, किशोर परदेशी कल्याण काळे संतोष शिंगारे बाळासाहेब मामडगे, सरपंच औदुंबर मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी खाते प्रमुख विभाग प्रमुख कर्मचारी कामगार ऊस तोडणी मजूर वाहतूकदार ठेकेदार आदी उपस्थित होते

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा केला सन्मान

यावेळी कारखान्याचे सर्वाधिक मोठे उस उत्पादक तथा पुरवठादार शेतकरी सुषमा मोहन किर्दंत, रविकांत औसेकर, भालचंद्र सिरसाट, चंद्रकांत केदार, ऋषिकेश आकनगिरे, गोपाळ पाटील यांचा त्यांनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सत्कार करण्यात आला.