अंबाजोगाई: पोलिओमुक्त जगाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पुढाकाराने शहरात आयोजित केलेल्या पल्स पोलिओ मदत फेरीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. उमेश गरुडकर, प्रा. चवळे, शेख शकील, डॉ. नवनाथ घुगे आणि राधेशाम लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेरीचा प्रारंभ करण्यात आला. शहराच्या मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या फेरीत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जनजागृतीसोबतच पोलिओ निर्मूलनाच्या जागतिक अभियानाला लोकसहभागातून दीड हजार डॉलर्सचे आर्थिक योगदान मिळवून दिले. या भरीव कामगिरीमुळे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये या वर्षाचा पहिला ‘End Polio Now Champion Club’ हा मानाचा बहुमान रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीला मिळाला आहे.
विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग
रोटरी इंटरनॅशनलच्या ‘End Polio Now’ या जागतिक मोहिमेला बळ देण्यासाठी रोटरी क्लब आणि इंटरॅक्ट क्लब यांनी संयुक्तरीत्या हा उपक्रम हाती घेतला होता. या फेरीमध्ये स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर, गुरुदेव विद्यालय मोरेवाडी, वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल आणि एमआयटी न्यू इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थांच्या इंटरॅक्ट क्लबमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. बालवयातच विद्यार्थ्यांना जागतिक आरोग्य अभियानाची जाणीव करून देत समाजकार्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला असून, अंबाजोगाईकरांनीही या मोहिमेचे मनापासून स्वागत केले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!