अंबाजोगाई : महिलांनी अनिष्ट परंपरांचा त्याग करून विज्ञानाची कास धरावी आणि विवेकी विचारांच्या बळावर कुटुंबात स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडावे, असे परखड मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव ॲड. रंजना गावंडे यांनी व्यक्त केले. मानवलोक संचालित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने आयोजित ४० व्या 'माहेर मेळाव्यात' त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी 'महिलांचा अंधश्रद्धेकडे वाढता कल' या विषयावर उपस्थित महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

अंधश्रद्धेविरुद्ध जागृती आणि माहेरचा ओलावा

भोंदू बाबा महिलांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची कशी फसवणूक करतात, याचे दाखले ॲड. गावंडे यांनी विविध प्रसंगांतून दिले. दररोजच्या संघर्षातून महिलांना काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि एकजुटीने लढण्याचे मानसिक बळ मिळावे, या उद्देशाने मनस्विनी प्रकल्पाशी जोडलेल्या व समुपदेशन केंद्रात नोंदणीकृत ग्रामीण महिलांसाठी दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते.

आरोग्य तपासणी व सांस्कृतिक आनंद

या मेळाव्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ग्रामीण भागातील ११६ महिलांनी दांडिया, मेहंदी आणि सेल्फी पॉइंटवर मनमुराद आनंद लुटत खऱ्या अर्थाने माहेरपणाचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुंधती पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती यांनी केले. आभार आशा मडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हर्षा पुरी आणि अंजली कोदरकर यांनी नियोजन केले, तर डॉ. ज्योती, साबेरा, आरती, संजीवनी, संजना, सावित्री आणि कल्पना यांनी विशेष परिश्रम घेतले.