अंबाजोगाई: विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी मूल्ये रुजवण्यासाठी येथील मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (परळी उपकेंद्र) यांच्या सहकार्याने सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पॉवर ग्रिडचे महाप्रबंधक हर्षद गायकवाड, व्यवस्थापक अक्षय मोगलवार, प्रेमनाथ माळी यांच्यासह डॉ. अरुंधती पाटील, डॉ. नजीर शेख, प्रा. सुकेशिनी जोगदंड, डॉ. किसन शिनगारे आणि डॉ. हनुमंत साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीत युवकांची भूमिका मोलाची: हर्षद गायकवाड

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हर्षद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भ्रष्टाचाराच्या समस्येवर प्रकाश टाकत पारदर्शक प्रशासकीय व्यवस्थेचे महत्त्व विशद केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची जपणूक करून भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. नजीर शेख यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या वतीने महाविद्यालयाला क्रीडा साहित्यही भेट देण्यात आले.

निबंध स्पर्धेतील गुणवंतांना रोख बक्षिसे व गौरव

स्पर्धेचे निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात अशोक आचार्य यांनी प्रथम, आदम शेख यांनी द्वितीय, कु. साक्षी वाव्हळे यांनी तृतीय तर श्रीकृष्ण चौरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हनुमंत साळुंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. किसन शिनगारे यांनी मानले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली.