माजलगाव: खामगाव-पंढरपूर सिमेंट महामार्गावरील सदोष कामामुळे आणि गुत्तेदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणाने रविवारी पाच निष्पाप तरुणांचा बळी गेला. या भीषण अपघाताला जबाबदार धरून दिलीप बिल्डकॉन (डीबीएल) कंपनीचे ठेकेदार आणि संबंधित इंजिनिअरवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी १०.५० वाजता तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणांच्या कारला शिंदेवाडी फाट्याजवळ ठेकेदाराने सोडलेल्या खड्ड्यांमुळे उसळी मिळाली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसची जोराची धडक बसून हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
ज्ञानेश्वर महादेव गिरी (वय २६, रा. शिपे टाकळी, माजलगाव) यांनी याप्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दिली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्याचे बांधकाम करताना ठेकेदाराने निष्काळजीपणाने ठेवलेले खड्डे, चढ-उतार आणि पडलेल्या भेगा यामुळेच हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अंभोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
असा घडला काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
ओंकार महादेव गिरी (वय २०), गजानन महादेव नामदास (वय ३५), समर्थ गजानन नामदास (वय १२), ऋतिक मोतीलाल बडे (वय १८) आणि अनिल सेन हे सर्वजण हुंडाई आय २० कारने (MH26 AK4210) तुळजापूरकडे निघाले होते. ही कार गजानन नामदास चालवत होते. माजलगाव हद्दीतील शिंदेवाडी फाट्याजवळ आल्यावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कार हवेत उडाली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसवर (MH20BL2740) जाऊन अत्यंत वेगात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारमधील पाचही जणांना गंभीर मार लागला आणि त्यातच त्यांचा करुण अंत झाला. प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या या ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी पाच जीव गेल्याने परिसरात संतापाची मोठी लाट उसळली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!