माजलगाव: शहरात ट्युशनसाठी जाणाऱ्या ग्रामसेवक आणि त्यांच्या दहा वर्षीय मुलीच्या अंगावर पेटता फटाका (तोफ) फेकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेत फटाका दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर पडून स्फोट झाल्याने बाप-लेक दोघेही भाजून जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप साधूजी खरात (वय ४२, रा. काडीवडगाव क्र. ०२, मंजरथ रोड, माजलगाव) असे जखमी झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तर मंगेश पंढरी शिंदे (रा. काडीवडगाव क्र. ०२, मंजरथ रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दिलीप खरात हे आपली मुलगी आर्या हिला दुचाकीवरून कोचिंग क्लासला सोडण्यासाठी चालले होते. ते मंजरथ रोडवरील करांडे सर यांच्या घरासमोर आले असता, पाठीमागून आलेल्या मंगेश शिंदे याने जाणीवपूर्वक त्यांच्या दिशेने पेटती तोफ फेकली.

हा पेटता फटाका थेट दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर पडला आणि मोठा आवाज झाला. यामध्ये दिलीप खरात यांचा उजवा हात आणि मांडी भाजली. तसेच आर्या हिचा उजवा हात आणि उजव्या पायाची पोटरी भाजून ती जखमी झाली. या घटनेनंतर दिलीप खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात मंगेश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल गुरखुडे हे करत असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.