अंबाजोगाई: तालुक्यातील नांदगाव येथे एका अज्ञाताने अतिशय नीच कृत्य करत शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनचा ढीग जाळून खाक केला. गुरुवारी रात्री घडलेल्या या भयंकर घटनेत गट क्रमांक १०१ मधील तब्बल ४ एकरांतील सोयाबीनची राख झाली असून, यात लक्ष्मण शिवाजी चव्हाण या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

आधीच भीषण दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत रक्ताचे पाणी करून पिकवलेला आणि ऐन पदरात पडलेला घास अज्ञाताने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच उद्धव गाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी शैलेश शिंदे, ग्राम महसूल अधिकारी शेख सलीम आणि पोलीस पाटील यांनी तातडीने शेतात जाऊन पाहणी केली आणि नुकसानीचा पंचनामा केला. या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण चव्हाण यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून, गरिबाच्या पोटावर पाय देणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे.