राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बनसारोळा (ता. केज) येथील आयडीबीआय बँकेला राष्ट्रवादीचे नेते रमेशराव आडसकर यांनी थेट बँकेत जाऊन जाब विचारला. २ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची यादी प्रसिद्ध न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी बँक प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र, बनसारोळा शाखेने अद्याप यादी प्रसिद्ध न केल्याने परिसरातील बनसारोळा, आवसगाव, बोरीसावरगाव, कौडगाव, औरंगपूर आणि इस्थळ येथील शेतकरी बँकेच्या वाऱ्या करून त्रस्त झाले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर २८ ऑक्टोबर रोजी आडसकर यांनी शेतकऱ्यांसह थेट बँक गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रश्नी त्यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरून तातडीची चर्चा करत बँक प्रशासनाला योग्य सूचना देण्याची विनंती केली.
रमेशराव आडसकर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बँक प्रशासनाने नमते घेत वरिष्ठांशी चर्चा करून मुदतीच्या आत यादी प्रसिद्ध करण्याचे सकारात्मक आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!