केज: केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे एका सोळा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आकाश नितीन बोबडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत होता. ऐन उमेदीच्या वयात मुलाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरात कोणी नसताना टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश बोबडे हा गोटेगाव (ता. केज) येथील सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. सोमवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी त्याचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना, आकाश घरात एकटाच होता. या दरम्यान त्याने घरातील भिंतीला खिळा ठोकून नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांकडून पंचनामा, कारण अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे आणि मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, केज येथे हलविला. आकाशने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!